सह्याद्रिनगर, कांदिवली (प)
+912228696958
info@ndpatilschools.com

गमती जमतीतले शोध

रयत शिक्षण संस्थेचे,

गमती जमतीतले शोध

गुहेतला माणूस दगड – मातीची घरे बांधून राहू लागला .कुडा-मातीच्या झोपडीवजा घरातला माणूस आता सिमेंट कॉन्क्रीटच्या टोलेजंग टॉवरमध्ये राहू लागला आहे. अश्मयुगात गतिमान झालेले चाक अद्यापही अवघ्या जगाला वेगाने पळवत आहे.मानव हा बुद्धिमान प्राणी आहे म्हणून तो कोट्यावधी वर्षांपूर्वीपासूनही अस्तित्वात असलेल्या महाकाय प्राण्यांवरही अधिराज्य गाजवून स्वतःची सत्ता या वसुंधरेवर थाटू शकला आहे.असे असले तरी अंगठा आणि त्याची सहजपणे  हलणारी बोटे अशी असलेली त्याच्या हाताच्या पंजांची रचना त्याच्या जीवनात क्रांती आणणारी ठरली असे मला वाटते; कारण आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर त्याने निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूंवर आपल्या सहजपणे हलणाऱ्या बोटांच्या व अंगठ्याच्या सहाय्याने प्रक्रिया करायला सुरुवात केली आणि तो विज्ञानयुगावर स्वार झाला.सकाळच्या ब्रशपासून रात्रीच्या ‘गुड नाईट’ पर्यंत अनेक शोध या मानवाने लावले. एखाद्या घटनेतील कार्यकारण भाव शोधणे,त्या  घटनेतील ‘का ?’चे उत्तर शोधणे या कुतुहलातूनच नवनवीन शोध लागले.काही शोध प्रचंड चिकाटीमुळे लागले तर काही सहज गमतीतून.असेच काही गमतीतून लागलेले शोध विज्ञानप्रेमी वाचकांसाठी संकलित करून द्यावेसे वाटतात.

 चुंबकाचा शोध
( मॅग्नेट) खरं पाहता भूत ही संकल्पना ( की कल्पना) विज्ञान मानत नाही. मात्र भुताखेताच्या गोष्टी ऐकायला सर्वांनाच मजा वाटते .मात्र असा एखादा प्रसंग अनुभवायची वेळ आली की तोंडचं पाणी पळतं.आखाती देशातील मॅग्नेशिया या गावची एक घटना आहे.एक धनगर आपल्या मेंढ्या चारायला डोंगरावर गेला असता त्याला त्याचे पाऊल उचलता येईना.जोड्यांसकट आपले पाय कुणीतरी घट्ट धरून ठेवलेत असं त्याला जाणवलं.आजूबाजूला तर कुणीच नव्हतं.तो जीवाच्या आकांताने ओरडला ,”भूत! भूत! वाचवा.वाचवा.” त्याचा आरडाओरडा ऐकून आसपासची धनगरमंडळी धावत आली.त्यांच्यापैकी काहींना त्या ठिकाणी असाच अनुभव आला.घाबरून त्यांनी जोड्यांतून पाय काढून घेतले आणि अनवाणी पायांनी धावत सुटले.आता कुणी त्यांचे पाय खेचत नव्हतं.असं का ? ज्यांच्या जोड्याला खाली लोखंडी नाल नव्हती त्यांना मात्र हा पाय खेचण्याचा अनुभव नाही आला.ही काय भानगड होती ? हे कसलं अजब भूत ? खूप शोधशोध केल्यावर त्यांना कारण सापडलं. मॅग्नेशिया ह्या ठिकाणी एक प्रकारचा काळा दगड होता.ज्यांच्या जोड्यांना लोखंडी नाल ठोकली होती त्यांचे जोडे ह्या काळ्या दगडाला घट्ट चिकटून बसले होते.इतरांना त्या दगडाचा काही त्रास नव्हता. निसर्गात आढळणाऱ्या या विशिष्ट प्रकारच्या दगडात लोखंडी तुकड्यांना आपल्याकडे ओढून घेण्याचा गुण होता.हा दगड म्हणजेच आपला चुंबक. मॅग्नेशिया या गावी सापडल्यामुळे त्याला ‘मॅग्नेट’ हे नाव पडलं.आज हाच चुंबक अनेक उपकरणांमध्ये वापरला जातो.

व्ह्ल्कनाईज्ड रबर
आपल्या रोजच्या व्यवहारात आपण कित्येक रबरी वस्तू वापरतो.मुख्यत: रस्त्यांवरून सतत धावणाऱ्या वाहनांना मजबूत म्हणजेच ऊन,वारा,पाऊस किंवा एखादे रसायन या कशाचाही परिणाम होणार नाही अशा चाकांची आवश्यकता होती. आपली ही गरज भरून काढली ती व्ह्ल्कनाईज्ड रबराने. तुम्हाला माहिती आहे का या रबराचा शोध कसा लागला ? बायकोला घाबरून केलेल्या चुकीमुळे चार्ल्स गुडियारकडून या रबराचा शोध लागला. सुरुवातीच्या काळात रबराचे जोडे, हातमोजे. वापरले जात मात्र उन्हामुळे ते वितळत असत त्यामुळे कोणत्याही मोसमाचा परिणाम होणार नाही असा रबर शोधून काढण्यासाठी चार्ल्सने खूप प्रयत्न केले.रबरावरील विविध प्रयोग करण्यात तो पुरता कर्जबाजारी झाला होता त्यामुळे त्याच्या बायकोने हलाखीच्या परिस्थितीला वैतागून त्याला त्याचे प्रयोग काही दिवसांपुरते बंद ठेवण्याचे सुचवले;पण प्रयोग करण्याशिवाय त्याचे मन कशात रमतच नव्हते. एके दिवशी बायको बाजारात गेल्याचे पाहून चार्ल्सने गुपचूप आपल्या प्रयोगाला सुरुवात केली. रबरामध्ये गंधक मिसळून तो त्याची चाचणी घेणार होता .इतक्यातच बायको परत आल्याची त्याला चाहूल लागली.चार्ल्सने ते मिश्रण घाईघाईने फेकून दिले.त्या गडबडीत ते चुलीवरच्या तव्यावर पडले आणि काय आश्चर्य ! गंधक मिसळलेलं ते रबर तव्यावर पडूनदेखील अजिबात वितळले नाही.तापलेल्या तव्यामुळे थोडेसे होरपळल्यासारखे दिसले इतकेच. चार्ल्स आनंदाने बेभान झाला. तो ज्यासाठी अतोनात मेहनत घेत होता ते (व्ह्ल्कनाईज्ड रबर) सापडलं होतं.नंतर रबराच्या चिकात विविध प्रमाणात गंधक मिसळून चार्ल्स गुडियारने कोणत्याही मोसमात कशाचाही परिणाम न होणारा रबर तयार केला.त्यालाच पुढे व्ह्ल्कनाईज्ड रबर हे नाव पडलं.